पिस्तुलातून गोळी सुटून तरुण गंभीर जखमी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पिस्तूल हाताळल्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो याची जाणीव असतानाही पिस्तूल चालवून एका तरुणास गंभीर जखमी केले. उपचारासाठी संबंधित डॉक्टरांना खोटी माहिती देणार्‍या महाठकास वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.
अझहर शफी सय्यद (रा.अन्सार कॉलनी, सरोज स्कूल शेजारी, पडेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून जिवंत काडतूस, एका पिस्तूलसह ३३ हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. ही घटना दि. ६ रोजी लिबेंजळगाव टोलनाक्यालगत घडली होती. चौकशीअंती पोलिसांनी आरोपीवर ८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या लिंबेजळगावलगतच्या टोलनाका परिसरात अझहरने बेकायदा पिस्तूल समोर चालवून फायर केले. 
पिस्तूलमधील गोळी जवळच असलेल्या महेश दत्तात्रय पवारच्या (२३, रा. बजाजनगर) उजव्या मांडीत घुसल्याने तो घटनास्थळीच रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत असलेल्या महेशला अझहरने घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी अझहरने रुग्णालयात खोटी माहिती दिली. पोलिसांनाही कळविले नाही. पोलिसांनी पडेगाव येथून अझहरला अटक केली. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच अझहरने आपले तोंड उघडले. जखमी महेशवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अझहर सफी सय्यद याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक वंदना बाबासाहेब मुळे यांनी फिर्याद दिली. 
पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शितोळे करीत आहेत.
घाटीतून मिळाली माहिती
घाटीतून आलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा बनाव उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले. त्यामुळे अझहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सिनेस्टाईल घटनेमुळे वाळूज भागात खळबळ उडाली आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.